वन बार वन व्होट संकल्पनेमुळं ठाण्यातील वकील सदस्यांची संख्या निम्म्यानं घटल्याची माहिती ठाणे बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश भोसले यांनी दिली. जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ गुलाबराव गावंड आणि प्रभाकर थोरात यांनी या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. एका बार कौन्सिलचा सदस्य असलेला वकील अन्य बार कौन्सिलमध्येही सदस्यत्व स्वीकारून त्याद्वारे अनेक ठिकाणी मतदान करत असतात. त्यामुळं वन बार वन व्होट ही संकल्पना राबवण्याबाबत आदेश देण्याची मागणी त्यांच्यासह अन्य तीन याचिकाकर्त्यांनी केली होती. न्यायालयानं एकाच बार कौन्सिलमध्ये सदस्यांना मतदान करता येईल असे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे बार कौन्सिलनं सर्व वकील सदस्यांना प्रतिज्ञापत्र भरून देण्याचं आवाहन केलं होतं. ठाणे न्यायालयात ३ हजार ९७५ सदस्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १८४० सदस्यांनी प्रतिज्ञापत्र भरून दिलं आहे. आता याची छाननी करून अंतिम मतदारयादी केली जाईल असं प्रकाश भोसले यांनी सांगितलं. ज्या वकीलांनी ठाणे बार असोसिएशनला हमी पत्र दिलं आहे तेच या ठिकाणी मतदान करू शकतात. अन्य वकील संघटनेच्या निवडणुकीत त्यांनी मतदान केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तसंच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा अशा वकीलांच्या सनदीबाबतही कारवाई करू शकते असे गुलाबराव गावंड यांनी सांगितलं.
