वनवासी कल्याणाश्रमातर्फे ठाण्यामध्ये २७ ते २९ ऑक्टोबर या काळात एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नौपाड्यातील ब्राह्मण सेवा संघामध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. वनवासी बांधवांना सामान्य प्रवाहात आणण्यासाठी गेली ६६ वर्ष वनवासी कल्याणाश्रम ही संस्था काम करत आहे. वनवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि या प्रदर्शनातून होणा-या विक्रीच्या माध्यमातून त्यांची आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल व्हावी हा हेतू ठेवून वनवासी कल्याणश्रम ठाणे महानगर शाखेतर्फे गेली २२ वर्ष या प्रदर्शनाचं आयोजन करत आहे. या प्रदर्शनात कागदाचा लगदा, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, दागदागिने, मोहाच्या फुलापासून बनवलेले औषधी आणि खाण्याचे पदार्थ, वारली चित्रकला, भिंतीवर टांगण्यासाठी वस्तू, खापरावर केलेलं काम तसंच नाडी परीक्षेच्या सहाय्यानं वनऔषधी उपचार, नाचणी सत्व, मध, चिकूचे पदार्थ, झुणका आणि नाचणीची भाकर अशा विविध वस्तू प्रदर्शित केल्या जाणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं असून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन वनवासी कल्याणाश्रमानं केलं आहे.
