लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांचा ठाण्यातील लाभार्थ्यांशी संवाद

वीरबाला हाली बरफच्या घराची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस करण्यात आली. शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणा-या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती मुख्यमंत्री लोकसंवाद या माध्यमातून जाणून घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज इतर जिल्ह्यांबरोबरच ठाण्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. हाली बरफ या २० वर्षीय आदिवासी युवतीनं बिबळ्याशी मुकाबला करून त्याला पळवून लावले होते. त्याबद्दल तिचा राष्ट्रीय वीरबाला शौर्य पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता. हालीला शबरी आवास योजनेतून घर मंजूर झालं असून २० हजार रूपयांचा पहिला हफ्ता तिला मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी हाली बरफला घराचं काम कुठपर्यंत आलं याची विचारणा करत तिचं अभिनंदन केलं. त्यावेळी तिनं आपल्या घराच्या जोत्याचं काम झालं असल्याचं सांगितलं. आपल्याला नोकरी मिळाली असून त्यामुळं कुटुंबाची गुजराण सुरू असल्याची माहिती यावेळी तिनं मुख्यमंत्र्यांना दिली. वसई जवळच्या एका इंजक्शन, सलाईन बाटल्या तयार करणा-या सुनिता बरफचंही घराचं स्वप्न साकार झालं. तिलाही पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पैसे मिळाले. सुनिताला घर बांधण्यासाठी पैसे मिळणार असल्याची माहिती तिने नव-याला दिली असता त्यालाही ते खरं नव्हतं. पण अवघ्या काही महिन्यात घराचे हफ्ते तिला मिळाले आणि तिचं घराचं स्वप्न पूर्ण झालं. अंबरनाथमधील कैलास धुळे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. कॅमे-यात दिसणारे प्रधानमंत्री आवास योजनेतील घर पाहून मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या घराचं कौतुक केलं. घराची रंगसंगती कोणी निवडली असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी त्यांना विचारला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

%d bloggers like this: