लक्ष्मीपूजन घरोघरी धुमधडाक्यात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरं

लक्ष्मीपूजन घरोघरी आज धुमधडाक्यात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरं होत आहे. लक्ष्मीपूजनाविषयी एक कथा आहे. समुद्र मंथनातून लक्ष्मी बाहेर येण्याअगोदर अलक्ष्मी समुद्रातून वर आली. समुद्रातून बाहेर आल्यावर तीनं विचारलं, मी कुठे राहू, त्यावर तिला असं सांगण्यात आलं की, ज्या घरात कलह होतो, अभक्ष्य भक्षण केलं जातं, देव-गुरू-अतिथी यांचा अपमान, अधार्मिक गोष्टी चालू असतील ती तुझी राहण्याची ठिकाणं असतील. दारिद्र्याचं प्रतिक म्हणून तिला अक्काबाई असं म्हणतात. या अक्काबाईचा फेरा आपल्या घरी येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या आधी या लक्ष्मीचं किंवा तिचं प्रतिक समजल्या जाणा-या केरसुणीचं पूजन करण्याची प्रथा आहे. संध्याकाळी गोरस मुहुर्तावर घरोघरी तसंच व्यापा-यांकडेही लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि धार्मिक मंत्रांच्या घोषात करण्यात आलं. आठ पाकळ्यांच्या कमळावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करण्यात आली. लक्ष्मी हे प्रेमाचं, वैभवाचं आणि सौंदर्याचं प्रतिक आहे. त्यामुळं ठिकठिकाणच्या व्यापा-यांनी पुढील वर्षाच्या जमाखर्चाच्या वह्यांची तसंच लेखन साहित्याचीही मोठ्या थाटामाटात पूजा केली. ही पूजा केल्यानं लक्ष्मी सदैव वास करते आणि दु:ख-दारिद्र्य याची बाधा होऊ देत नाही अशी ही पूजा करण्यामागे श्रध्दा आहे.

लक्ष्मीची धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तीलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी अशी आठ रूपे आहेत. केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे. सन्मार्गाने मिळविलेला पैसा आणि सन्मार्गासाठी खर्च होणारा पैसा यालाच लक्ष्मी म्हणतात. अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण.  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचीही पूजा करून तिचे गावाबाहेर विसर्जन केले जाते. अलक्ष्मीचे वाहन गाढव असून तिच्या हातात शस्त्र म्हणून झाडू असतो. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे. कुबेर हा संपत्तीचा रक्षक म्हणून मानला जातो. म्हणून त्याचीही लक्ष्मीबरोबर पूजा करतात.

Leave a Comment

%d bloggers like this: