तब्बल ५ दशकांपासूनची मुरबाड वासियांची रेल्वेची मागणी पूर्ण झाली असून या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यासाठी सव्वासातशे कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी टिटवाळा ते मुरबाड मार्गासाठी सर्वेक्षण केले. मात्र नंतर उल्हासनगरमार्गे मुरबाडपर्यंत रेल्वेमार्गाचं नियोजन करण्यात आलं. कल्याण ते मुरबाड या रेल्वेसाठी कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, कांबारोड, आपटी, पोटगाव आणि मुरबाड अशी रेल्वे स्थानकं असणार आहेत. कल्याण ते मुरबाड या २८ किलोमीटरच्या मार्गात ३ मोठे पूल, ३९ छोटे पूल, ५ रेल्वे उड्डाणपूल, ७ बोगदे, १० भुयारी मार्गिका असतील आणि येत्या ४ वर्षात या मार्गाचं काम पूर्ण केलं जाईल असं खासदार कपिल पाटील यांनी सांगितलं.
