मुंब्रा, कळवा परिसरातील वीजेचे खाजगीकरण करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्याच्या कालावधीत हे खाजगीकरण केलं जाणार असल्याची माहिती महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली. गेल्या ४ वर्षाच्या कार्यकाळातील महावितरणनं केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पाठक यांनी ही माहिती दिली. भिवंडीत पूर्वी नुकसान होत होते. परंतु टोरोंटो कंपनीकडे काम सोपवण्यात आल्यानंतर ५० टक्के होणारं नुकसान आता १८ टक्क्यांवर आल्याचं पाठक यांनी सांगितलं. राज्यात शेतक-यांकडे २५ हजार कोटींची थकबाकी आहे. यात ग्राहकांचे ५ हजार कोटी आहेत. जिल्ह्यामध्ये २९६ कोटींची थकबाकी असून कळवा, मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान आणि थकबाकी आहे. मुंब्र्यामध्ये ७३ कोटी तर कळव्यामध्ये २० कोटींची थकबाकी असल्यामुळं या विभागाचं खाजगीकरण करण्याची मागणी होती. जिल्ह्यामध्ये ३ लाख ८७ हजार दोषयुक्त मीटर होते. विद्युत मीटर बसवण्याचं काम रोलॅक्स आणि फ्लॅश या दोन कंपन्यांना देण्यात आलं होतं. या दोन्ही कंपन्यांना काळ्या यादीत टाकून त्यांची अनामतही जप्त करण्यात आल्याचं विश्वास पाठक यांनी यावेळी सांगितलं.
