माजी कुलगूरू अशोक प्रधान यांना माराहाण प्रकरणात पोलिस आयुक्तांना निलंबित करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु अशोक प्रधान  यांना मारहाण प्रकरणी पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरल्यामुळेच, या घटनेची सर्वस्वी जबादारी ही, ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची असल्याने, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे. अशोक प्रधान यांना, त्यांच्या कल्याण येथील राहत्या बंगल्यात शिरुन, पाचजणांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना सायंकाळी घडलेली आहे. कल्याणस्थित छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेतील एका निलंबित शिक्षकाने, त्याच्या चार साथीदारांसह, मारहाण केल्याचा प्रकार प्रसिद्धीमाध्यमांद्वारे उघडकीस आलेला आहे. अशोक प्रधान हे, मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु, कल्याण जनता बँकेचे विश्वस्त आणि कल्याण येथील छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला, कल्याणसारख्या सांस्कृतिक आणि गजबजलेल्या शहरात, थेट त्यांच्या बंगल्यात घुसून मारहाण होणे, हा प्रकार निंदनीय आणि घृणास्पद असून, या घटनेचा ‘धर्मराज्य पक्ष’ तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत आहे. अशोक प्रधान यांना मारहाण करणारा मुख्य आरोपी संजय जाधव हा, छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असताना,  त्याला चार वर्षांपूर्वी काही कारणास्तव निलंबित करण्यात आले होते. आपल्यावरील निलंबन रद्द करण्यात यावे यासाठी, संजय जाधव हा, अशोक प्रधान यांच्यावर दबाव टाकत होता. मात्र, याबाबत आपण काहीच करु शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने, संजय जाधव याने आपल्या चार साथीदारांसह, प्रधान यांना मारहाण केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी, अशोक प्रधान यांच्या तक्रारीनंतर, संजय जाधव यांच्यासह, इतर चारजणांवर गुन्हा दाखल झालेला असला तरी, या संतापजनक घटनेतील गांभीर्य दुर्लक्षून चालणार नाही. अशोक प्रधान हे तर, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. असे असतानाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र  खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात, एका ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर, प्राणघातक हल्ला होणे याचा अर्थ, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली असून, समाजकंटकांवर कायद्याचा कोणताही धाक उरलेला नसल्याचेच यातून ठळकपणे अधोरेखित होत आहे. याप्रकरणी, तपासाअंती आरोपींना अटक होईल, त्यांना योग्य ती शिक्षादेखील होईल; मात्र, अशाप्रकारच्या प्रवृत्ती पूर्णपणे नेस्तनाबूत होण्यासाठी, ठाणे पोलीस आयुक्तालयाने कठोर पाऊले उचलणे अत्यंत गरजेचे आहे.आणि, याकामी पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरल्यामुळेच, या घटनेची सर्वस्वी जबादारी ही, ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची असल्याने, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी आग्रही मागणी  धर्मराज्य पक्षानं केली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading