भरधाव टोईंग वाहनाच्या धडकेत रिक्षा उलटल्यानं एक महिला जखमी झाली असून तिची दोन्ही लहान मुलं मात्र या अपघातात सुदैवानं बचावली आहेत. ज्युपिटर रूग्णालयासमोर ही घटना घडली. विजयनगरी ॲनेक्स येथे राहणा-या रेजी बिजू या आपल्या दोन्ही मुलांना सिंघानिया शाळेतून आणण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास मुलांसह घरी परतत असताना ज्युपिटर रूग्णालयासमोरून मुंबईकडे नाशिक महामार्गावरून पाठीमागून आलेल्या टोईंग व्हॅननं रिक्षाला धडक दिली. धडकेनंतर रिक्षा फरफटत गेल्यानं ती बिजू यांच्या दोन्ही पायांवर उलटली. रिक्षा अंगावर पडून त्यांचे पाय जायबंदी झाले. सुदैवानं या अपघातात त्यांच्या दोन्ही मुलांना इजा झाली नाही. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी दुर्घटनाग्रस्त रिक्षातील जखमींना रूग्णालयात दाखल केले.
