बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी अनाथ मुस्लिम मुलाचा सांभाळ केल्यामुळं त्याचं आयुष्य बदललं

एका अनाथ मुस्लीम मुलाचा बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी सांभाळ केल्यामुळं या मुलाच्या आयुष्याला चांगलं वळण मिळालं आहे. अब्दुल रशीद हा ५ वर्षाचा असताना त्याच्या आई-वडिलांनी त्याला रेल्वे स्थानकात सोडून दिलं होतं. अशाच वातावरणात मोठा होत अब्दुल रशिद शालांत परीक्षा उत्तीर्ण झाला. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याला बेडेकर महाविद्यालयात प्रवेश मिळाला. या महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी अब्दुल रशिदमधील चुणचुणीतपणा पाहिला आणि याला योग्य मार्गदर्शन आणि चांगले संस्कार मिळाल्यास त्याच्या जीवनाला चांगलं वळण लागू शकेल या हेतूनं त्याला आपल्या घरी सांभाळण्यासाठी नेण्याचा विचार केला. आपल्या पतीशी याबाबत चर्चा करून त्यांनी अब्दुल रशिदला आपल्या कुटुंबात आणले. सुरूवातीला त्यांच्या दोन मुलांनी याबाबत काहीसा असहकार दाखवला. मात्र कालांतराने या दोन मुलांनीही त्याला स्वीकारलं. नाईक यांच्या काही नातेवाईकांचाही अब्दुल रशिदला घरी आणण्यास विरोध होता. पण हळूहळू या नातेवाईकांनीही अब्दुल रशिदचा स्वीकार केला. अब्दुल रशिद मुस्लिम असल्यामुळं तो घरात नमाज अदा करायचा. तर नाईक कुटुंबिय दिवाळी आणि ईद एकत्र साजरे करायचे. अब्दुल रशिदचा इतिहासाकडे ओढा होता. आपल्या महाविद्यालयातही तो पहिला आला, नंतर त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. गेल्यावर्षी अब्दुल रशिदला टपाल कार्यालयात नोकरी मिळाली. त्यानंतर नाईक यांनी अब्दुल रशिदचं लग्नही लावून दिलं आहे. नाईक यांच्या मायेमुळं अब्दुल रशिदचं जीवन बदलून गेलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading