बाजारपेठ रस्त्यावरील फेरीवाले आणि रिक्षा स्टँड येत्या ९० दिवसात न हटवल्यास कुटुंबासह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा व्यापारी वर्गाचा इशारा

बाजारपेठ रस्त्यावरील फेरीवाले आणि बेकायदेशीर रिक्षा स्टँड येत्या ३१ मार्च पर्यंत न हलवल्यास कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुभाष पथ व्यापारी असोसिएशननं दिला आहे. आज एका पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला. बाजारपेठ रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर व्हावी आणि रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून महापालिकेनं बाजारपेठ रस्ता रूंद केला. यासाठी सुभाष पथावर असलेल्या दुकानदारांची जागा घेण्यात आली. या रूंदीकरणानंतर बाजारपेठ रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही अशी अपेक्षा होती. मात्र वाढलेल्या रस्त्यावर नो हॉकर्स झोन असताना फेरीवाले उभे राहत असून अनधिकृत रिक्षा स्टँडही पोलीसांच्या आशीर्वादानं सुरू आहे. याबाबत गेल्या दोन वर्षात प्रभाग अधिका-यापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व पातळीवर पत्र व्यवहार झाला, कारवाईची मागणी झाली पण आश्वासनापलिकडे व्यापारी वर्गाच्या हाती काहीही लागले नाही. पालिका आयुक्तांनी फेरीवाल्यांना मधल्या गल्ल्यांमध्ये हलवलं जाईल असं आश्वासन दिलं होतं. वाहतूक शाखेच्या उपायुक्तांनीही रिक्षा स्टँड बेकायदेशीर असून तो हटवण्यास सांगितलं होतं. पण अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. रस्ता रूंदीकरणाच्या वेळेस क्लोज सर्किट कॅमेरे लावले जातील. बेकायदा धंद्यांवर कारवाई केली जाईल. वीजेचे पोल अडवले जातील. प्रत्येक गल्लीजवळ वेग नियंत्रक लावले जातील अशी आश्वासनं देण्यात आली होती. पण गेल्या दोन वर्षात यापैकी काहीच न झाल्यामुळे आता व्यापा-यांनी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या सहकार्यानं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याप्रकरणात तातडीनं कारवाई न झाल्यास शांततामय मार्गानं आंदोलन छेडलं जाईल. सध्या व्यापा-यांनी आपल्या दुकानांमधून रस्ता रूंदीकरणासाठी दिलेल्या जागेचा वापर, अनधिकृत रिक्षा स्टँड आणि हॉकर्ससाठी होणार असेल तर ती जागा परत करावी असे मागणी करणारे फलक लावले आहेत. शांततामय आंदोलनानंतरही काही कारवाई न झाल्यास ३१ मार्चला कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: