फटाक्यांच्या धुमधडाक्यात अभ्यंगस्नानानं नरक चतुर्दशी साजरी

नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. आज पहाटे अभ्यंगस्नानानं मंगलमय वातावरणात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत हा दिवस साजरा झाला. नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान पहाटे धुमधडाक्यात करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयानं यंदा फक्त रात्री ८ ते १० या वेळे व्यतिरिक्त फटाके उडवण्यास प्रतिबंध लावले आहेत. मात्र तरीही रात्री उशीरापर्यंत आणि भल्या पहाटेही फटाक्यांची आतिषबाजी आणि धूमधडाका ऐकू येत होता. मात्र पूर्वीपेक्षा हे प्रमाण यंदा बरंच कमी झाल्याचं दिसून आलं. अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी कृष्णानं नरकासूराचा वध केला आणि त्याच्या बंदिवासातील १६ हजार तरूणींची मुक्तता केली. नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून कृष्ण सूर्योदयापूर्वीच परत आला. त्यावेळी त्याला अभ्यंगस्नान घालण्यात आलं. या घटनेची स्मृती म्हणून अभ्यंगस्नान केलं जातं. नरकासुराचं प्रतिक म्हणून कारिंटे पायाच्या अंगठ्यानं चिरडून अभ्यंगस्नान करतात. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर, सिध्दीविनायक मंदिर, घंटाळी देवी मंदिर, विठ्ठल सायन्ना दत्तमंदिर इथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठाण्याचा मासुंदा तलाव, कौपिनेश्वर मंदिर, राम मारूती रस्ता, तरूणांच्या उत्साहानं झळाळून निघाले होते. एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांनी दणक्यात दिवाळी साजरी केली. राम मारूती रस्ता, तलावपाळी परिसरात तरूणाईचा सागर उसळल्याचं चित्र दिसत होतं. विविध संस्थांतर्फे दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळं या परिसरात तरूणाईची मोठी गर्दी उसळली होती. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना इतकंच नाही तर राम मारूती रस्त्यावरील व्यापा-यांच्या असोसिएशनतर्फेही यंदा दिवाळीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राम मारूती रस्त्याकडे येणारे काही रस्ते बंद करण्यात आल्यामुळं शहरभर वाहतूक कोंडीचा अनुभव दुपारपर्यंत येत होता.

 

Leave a Comment

%d bloggers like this: