आकृतीबंधासह विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करून मोटार वाहन विभागातील कर्मचा-यांचे भवितव्य उध्वस्त करणारी धोरणे रेटण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचा आरोप करत मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेनं आज लेखणी बंद आंदोलन केलं. कर्मचा-यांच्या या आंदोलनामुळे आरटीओच्या कामकाजावर परिणाम होऊन नागरिकांचाही खोळंबा झाल्याचं दिसून आलं. आरटीओ कर्मचा-यांच्या आकृतीबंध या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी संघटनेनं वेळोवेली निवेदनं देऊन लक्षवेध करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यानं दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. या आंदोलनामुळे परिवहन विभागाच्या कामकाजावर परिणाम होऊन नागरिकांचाही खोळंबा झाला असला तरी कर्मचा-यांनी नागरिकांना तोंडी माहिती देत सहकार्य केलं पण एकूणच या आंदोलनामुळं नेहमी गजबजाट असणा-या परिसरात जाणवणारा शुकशुकाट होता.
