पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आज ठाण्यात उमटले. ठाण्यातील विविध पक्षांनी निदर्शनं करून या हल्ल्याचा निषेध केला. शिवसेनेतर्फे टेंभीनाक्यावर या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मध्यवर्ती राजगड कार्यालय येथे पुलवामा येथील भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही कळव्यामध्ये या हल्ल्याच्या आणि पाकिस्तानच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. मुंब्र्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकचे लष्कर प्रमुख कमर जावेद बावजा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. मुंब्र्यामध्ये जुम्म्याचा नमाज अदा केल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. तर उपस्थित मुल्ला मौलवींनी शहीद जवानांसाठी दुवा पठण केलं.
