पुढील शालिवाहन शकामध्ये विवाह मुहुर्ताचे अवघे ४ महिने

पुढच्यावर्षी शालिवाहन शके १९४२ मध्ये आश्विन अधिकमास येत असल्याने चातुर्मास पाच महिन्यांचा असणार आहे. पौष, माघ आणि फाल्गुन या महिन्यात गुरू- शुक्र ग्रहाचा अस्त असल्याने जवळ जवळ आठ महिने विवाह मुहूर्त नसणार आहेत. त्यामुळे चातुर्मास आणि गुरू- शुक्र ग्रहांच्या अस्त कालात विवाह मुहूर्त देण्याचा विचार पंचांगकर्ते करीत असल्याची माहिती खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी आपल्या व्याख्यानात दिली. महाराष्ट्र आणि गुजरातमधील पंचांगकर्त्यांची सभा नुकतीच सोलापूर येथे झाली. त्यावेळी याविषयी चर्चा करण्यात आली. शके १९४२ मध्ये आश्विन अधिकमास येत आहे. त्यामुळे चातुर्मास हा पाच महिन्यांचा असणार आहे. आतापर्यंत चातुर्मासात विवाह मुहूर्त दिले जात नसत. १९ जानेवारी २०२१ ते ११ फेब्रुवारी २०२१ गुरू ग्रहाचा अस्त आहे. तसेच २१ फेब्रुवारी २०२१ ते १६ एप्रिल २०२१ या कालात शुक्र ग्रहाचा अस्त आहे. आतापर्यंत गुरू- शुक्र ग्रहांचा अस्त असतांना विवाह मुहूर्त दिले जात नसत. त्यामुळे पौष, माघ आणि फाल्गुन महिन्यात विवाह मुहूर्त देता येणार नाहीत. आठ महिने विवाह मुहूर्त नसल्यामुळे अनेक लोकांची अडचण होणार आहे. म्हणून चातुर्मासात आणि गुरू-शुक्र अस्तकालात विवाह मुहूर्त देण्यासंबंधी पंचांगकर्त्यांच्या सभेत बरीच चर्चा झाली. पूर्वी चातुर्मासात शेतीची कामे असत. तसेच पावसाळा असल्याने प्रवासाची साधनेही कमी होती. आता काळ बदलला आहे. धार्मिक नियमात आपल्याला बदल करता येत नसला तरी कोणता प्राचीन ग्रंथ आधारभूत मानायचा हे आपण ठरवू शकतो. काही प्राचीन धर्मशास्त्र ग्रंथांमध्ये चातुर्मासात आणि गुरू-शुक्र अस्तकालात विवाह मुहूर्त देण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. पूर्वींच्या नियमांप्रमाणे विवाह मुहूर्त द्यायचेच आणि इतर ग्रंथांच्या आधारे चातुर्मासात आणि गुरू-शुक्र अस्त कालात गौण विवाह मुहूर्त द्यायचे असा निर्णय बहुतेक सर्व पंचांगकर्त्यांनी घेतला असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading