परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष नाही तर समन्वय हवा – अरूणा ढेरे

विद्रोह करणा-याची प्रत्येकाची आपली रीत आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष नाही तर समन्वय हवा त्यातून विकासाची पुढे जाण्याची वाट सापडते आणि ही वाट साहित्यातून जाते असं मत ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अरूणा ढेरे यांनी व्यक्त केल्या. मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे अरूणा ढेरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना अरूणा ढेरे बोलत होत्या. विठ्ठलाचे अनेक संप्रदाय झाले पण या संप्रदायात कधीही धार्मिक संघर्ष झाला नाही उलट त्यांनी महाराष्ट्र बांधला. महाराष्ट्रात प्राचीन काळीही अभिव्यक्ती करणा-या बायका होत्या. आधुनिक युगात स्त्री मुक्तीचे अनेक प्रयोग होताना आता होताना दिसतात. अंतर्वस्त्रापर्यंत या चळवळी गेल्या आहेत. पण पूर्वीही संत –कवयित्रीनींही असे प्रयोग केले. जेव्हा राजाने जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या संत-कवयित्रीने भर दरबारात आपली सर्व वस्त्रं उतरवून ही शरीररूपी चामड्याची पिशवी हवी तर घे पण माझं मन मिळणार नाही, हवं का तुला असा प्रश्न विचारणा-या बायका होत्या. यामुळं परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष नाही तर समन्वय आहे असं प्रतिपादन अरूणा ढेरे यांनी केलं. नवीन पध्दतीने आपली अध्यक्ष पदासाठी झालेली निवड हे साहित्य क्षेत्रातील मोठ्या बदलाचं लक्षण आहे. पण बदल हे एका रात्रीत होत नाहीत ते हळूहळू होतात. साहित्य संमेलन हा लोकोत्सव व्हावा हा संमेलनरूपी गोवर्धन उचलताना लोकांच्या काठ्या लागाव्यात आणि आपली करंगळी त्याचं निमित्त व्हावं अशी अपेक्षा अरूणा ढेरे यांनी व्यक्त केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज फार पूर्वीपासून समाज उठवत आहे. ज्ञानोबा-तुकारामांनी केलेलं बंड ही मराठी भाषेची एक नवी ज्ञान व्यवस्था आहे. सोवळे, ओवळे, पावित्र्य या सा-या माणसांनी घडवलेल्या गोष्टी आहेत. देवही माणसांनी घडविले. यामुळं धर्मसत्ता काय देणार, काय शिकवणार ? बायकांसह सर्वांना देवदर्शनं, मंदिरं खुली असावीत, ती कोणाची मक्तेदारी असू नये असं अरूणा ढेरे यांनी सांगितलं. यावेळी अरूणा ढेरे यांच्या कवितांचं सादरीकरण करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading