पंतप्रधान आवास योजनेचा महिलांनी केला ई-गृहप्रवेश

रहने के लिए न था मकान पक्का, न था खुद कि पहचान का शिक्का, फिर मोदीजीने दिया कृपाप्रसाद, प्रधानमंत्री ग्राम योजनासे मिला आवास ! अशा आशयाची  कविता  सादर करत ठाणे जिल्ह्यातील  प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी महिलांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुसवांद साधत ई-गृहप्रवेश केला.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील 29 जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील घरकुलांचं ई-वितरण केलं. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लाभार्थींशी संवाद साधला. विशेष म्हणजे ठाण्यातील महिलांशी ते आता बोलतील अशी घोषणा झाली आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील लाभार्थी महिला एकदम आनंदित झाल्या. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या या महिलांना प्रधानमंत्र्यांनी  एखादी कविता किंवा गाणे सादर करा असे मराठीतून सांगितले,  त्यावेळी उपस्थित महिलांपैकी हिरा वाघ यांनी  डोंगरी शेत माझं बेनु ग कसी,आलय वरीस राबवून मराव किती  हे कवी नारायण सुर्वे यांचे गीत सादर करत वाहवा मिळवली.

यावेळी अकलोलीच्या सुनिता बरफ यांनी आवास योजनेमुळे घरातील वातावरण सुखी समाधानी झाले असून पक्या घरात राहायला मिळालं, मोदीजी तुम्हाला धन्यवाद अशा शब्दात पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले. मोदींनी देखिल टेक्नोलॉजीमुळे तुमच्या घरी मी प्रवेश केल्याचे सांगत गरिबीशी मुकाबला करण्यासाठी मुलांना शिक्षण द्या असे आवर्जून सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३ हजार ७४० घरकुल बांधण्यात आली. तसेच शबरी, रमाई, आदिम हा राज्य पुरस्कृत योजनेच्या अंतर्गत सुद्धा पक्की घर बांधण्यात आली आहेत. यंदाचे असणारे ४६२ लक्षांक देखिल पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.  आवास योजनेत बांधलेली घर आकर्षक दिसावीत याकरीता जिल्ह्याची प्रसिद्ध असणाऱ्या वारली कलेचा वापर करण्यात आला आहे. घरांच्या भींतीवर वारली चित्र रेखाटण्यात आली आहेत. या कलेचा वापर केल्याने घराला आधुनिक रूप आल्याचे सांगत वारली कलेचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

जिल्हाधिकारी आवारात पारंपरिक वेशभूषेत आलेल्या या महिला या कार्यक्रमानंतर देखील खूप वेळ जिल्हाधिकारी कार्यालयात वावरत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार , प्रकल्प संचालक डॉ.रुपाली सातपुते यांच्या उपस्थितीत महिलांना गृह प्रवेशासाठी मंगलकलश भेट देण्यात आला.

Leave a Comment

%d bloggers like this: