नैसर्गिक हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेत ठाण्याच्या शरीरसौष्ठव पटूंची बाजी – ९ पदकांची लयलूट

कर्नाटक हौशी शरीरसौष्ठव संघटनेतर्फे आयोजित नैसर्गिक हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेत ठाण्याच्या शरीरसौष्ठव पटूंनी बाजी मारली असून ९ शरीरसौष्ठव पटूंनी पदकं पटकावली आहेत. गेल्या आठवड्यात बंगलोरमधील डॉ. आंबेडकर भवनमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नैसर्गिक शरीरसौष्ठव पटू म्हणजे जे खेळाडू कोणत्याही प्रकारचे संप्रेरकं न घेता व्यायाम करतात तेच खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. मुलं ६ ते १३, १३ ते १९, १९ ते २५, २५ ते ४०, ४० ते ५० आणि ५० पुढील तर मुली ६ ते १३, १३ ते १९, १९ ते २५ आणि २५ पुढील अशा १० गटात या स्पर्धा झाल्या. आसाम, मणिपूर, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू अशा विविध राज्यातून ११० शरीरसौष्ठव पटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्तरावर प्रथमच झालेल्या या नैसर्गिक हौशी शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातील सर्वच्या सर्व म्हणजे १९ खेळाडू हे ठाण्यातील होते. या १९ पैकी ९ शरीरसौष्ठव पटूंनी या स्पर्धेत पारितोषिक पटकावलं आहे. शरीरसौष्ठव कलेचं बाळकडू लहानपणापासूनच मिळावं आणि नैसर्गिक खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत १३ वर्षाच्या गटात निनाद केतकरला दुसरा क्रमांक मिळाला. मुलींच्या गटात कनिष्का शेट्टीला प्रथम तर निशिता शेट्टीला द्वितीय क्रमांक मिळाला. २० वर्षाखालील गटात वरूण केतकरला तृतीय क्रमांक मिळाला. २० वर्षाखालील गटात अजय पुजारीला द्वितीय तर जयेश राजेंद्रला तृतीय क्रमांक मिळाला. अक्षय कारभारी या शरीरसौष्ठव पटूला तिस-या गटात पहिला क्रमांक मिळाला. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून दोन दिवसापूर्वीच हे शरीरसौष्ठव पटू ठाण्यात आले.

 

Leave a Comment

%d bloggers like this: