ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या प्रेरणेनं सुरू झालेला वंचितांचा रंगमंच यावर्षी पाचव्या वर्षात पदार्पण करत असून यंदाचा नाट्यजल्लोष सोहळा शनिवार आणि रविवारी कॉम्रेड गोदाताई परूळेकर खुल्या रंगमंचावर होणार आहे. या नाट्यजल्लोषमध्ये १४ लोकवस्त्यांमधील गट आपल्या एकांकिका सादर करणार आहेत. यावर्षी समस्यांचं समाधान या कल्पनेभोवती नाटिका गुंफल्या जाणार आहेत. उथळसर गट, स्वच्छता आणि आरोग्य, माजिवडा गट मोबाईलचे दुष्परिणाम, मानपाड्यातील वस्तीतून अंधश्रध्दा आणि नागरी स्वच्छता अशा एकांकिका सादर केल्या जाणार असून भिवंडीतील भालवड येथील वस्तीतून यावर्षी प्रथमच आजी-आजोबा आणि नातवंडं यांच्या जिव्हाळ्याच्या नात्यावर आधारीत आधार कधी आम्हांला कधी तुम्हांला ही नाटिका सादर करणार आहेत. नाट्यजल्लोषचे प्रणेते रत्नाकर मतकरी यांनी नुकतीच वयाची ८० वर्ष पूर्ण केली आहेत त्यानिमित्त मतकरींना कलाकार, कार्यकर्ते आणि ठाणेकर हितचिंतक मानवंदना देणार आहेत.
