नवरात्रौत्सवात कमळाऐवजी वॉटर लिलीची विक्री करून भाविकांची दिशाभूल

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ही उक्ती कमळासाठी अगदी योग्य असून नवरात्रौत्सवात कमळाऐवजी वॉटर लिली म्हणजे निम्फिया फुलांची विक्री करून भाविकांची दिशाभूल केली जात आहे. निम्फिया हे फूल हुबेहूब कमळासारखेच दिसते. नवरात्रौत्सवाच्या काळात कमळ विक्रेते मोठ्या प्रमाणावर दिसतात. मात्र त्यांच्याकडे कमळाऐवजी वॉटर लिलीची फुलं विक्रीसाठी असतात. कमळ हे वॉटर लिलीच्या फुलापेक्षा मोठं असतं आणि मध्यभागी पिवळ्या रंगाचा फुगीर भाग, लालसर नारंगी रंगाच्या देठावरून कमळाचं फूल पटकन ओळखता येते तर लिलीचा देठ हा हिरव्या रंगाचा असतो. भारतीय संस्कृतीत कमळाचं मोठं महत्व असून नवरात्रौत्सवात देवीच्या पूजेसाठी कमळ पुष्प ठेवण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळं देवीच्या दर्शनाला जाताना हार, फुलं नसली तरी कमळाचं फूल देवीला अर्पण केलं जातं. जिथे देवीची स्थानं आहेत त्या ठिकाणी कमळाची फुलं विक्री करणा-या विक्रेत्यांची लगबग दिसते. मात्र अनेकदा त्यांच्याकडे कमळाऐवजी वॉटर लिलीची फुलं असतात. भाविक वॉटर लिलीची फुलं खरेदी करून ती देवीला कमळ पुष्प म्हणून वाहतात. मात्र काही विक्रेते भाविकांची फसवणूक करत असल्याची माहिती ज्येष्ठ वनस्पती तज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी दिली. वॉटर लिली आणि कमळ ही दोन्ही फुलं पाणथळ चिखलात वाढतात. लिलीची पानं पाण्याच्या पृष्ठभागाला चिकटलेली असतात तर कमळाची पानं पाण्याच्या वरच्या बाजूनं पसरून त्यांचा देठ दिसतो. वॉटर लिलीपेक्षा कमळ पुष्पाच्या पाकळ्या आकाराने मोठ्या असतात. आयुर्वेदात कमळाला मोठं महत्व आहे. होम हवनासाठी कमळाच्या बियांचा वापर केला जातो तर कंद खाण्यासाठी वापरतात. सूर्य जसजसा माथ्यावर येतो तसे कमळाचे फूल उमलते तर वॉटर लिलीचे फूल कायम उमलेलेलेच असते. पाण्यात ते २ आठवड्यापर्यंत टिकते तर कमळाचे फूल अवघे ४ ते ५ दिवस टिकते. कमळाचे परागसिंचन हे भुंग्याच्या माध्यमातून होत असल्याची माहिती नागेश टेकाळे यांनी दिली. उष्ण भागातील गोड्या उथळ पाण्यात लाल कमळाची मोठी वाढ होते. लाल कमळाची पानं गुळगुळीत देठाची असून खाली लवदार असतात. लाल रंगाची ही फुलं सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात उमलतात. उपल्या कमळाची पानं वर्तुळाकार असतात. पानाच्या खालच्या बाजूला ठिपके असतात. या जातीची फुलं जांभळी, फिक्कट निळी, पांढरी, गुलाबी रंगाची आणि मंद सुवासाची असतात. तर वॉटर लिली ही अनेक रंगात पहायला मिळते. सध्या कमळ १० रूपयांना विकलं जात असून नवरात्राच्या दिवसात याच कमळाचा भाव १५ ते २० रूपये होतो. मुंबई-ठाण्यात नवी मुंबई आणि गुजरातमधून कमळाची फुलं विक्रीसाठी येत असतात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading