नगररचना विभाग हा नियंत्रक म्हणून नव्हे तर प्रमोटर म्हणून काम करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इन्फ्रास्ट्रक्चर अपॉर्च्युनिटीज् एन्टरटेनमेंट यांचे विकेंद्रीकरण करून लहान लहान शहरं विकसित झाली पाहिजेत. यावर भर देताना नागरीकरणाची नवी तत्वं अंमलात आणून नगर नियोजनात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला जाईल असे विचार मुख्यमंत्र्यांनी आज व्यक्त केले. नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या १०५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. नगररचना विभाग हा नियंत्रक म्हणून नव्हे तर प्रमोटर म्हणून काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील सर्व जमिनीचं नियोजन पूर्ण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिका-यांना हा विभाग लोकाभिमुख करा आणि पूर्वीपासून या विभागावर असलेला नियंत्रकाचा शिक्का पुसून प्रमोटरच्या भूमिकेत मार्गदर्शक म्हणून काम करा असा संदेश दिला. इतके दिवस आपण नागरीकरण असे म्हणत होतो पण आता रिअर्बनायझेशन म्हणजेच पुन्हा नव्याने नागरीकरणाचा विचार आवश्यक असल्याचं सांगून शहरातील लोकांसाठी उत्तम वाहतूक, दळणवळण व्यवस्था असणे, क्लस्टर इमारतींचा पुनर्विकास, पायाभूत सुविधा संधी आणि मनोरंजन यांच्या विकेंद्रीकरणातून जर्मनीप्रमाणे लहान लहान शहरं निर्माण केली पाहिजेत असं सांगितलं. राज्यातील २५ जिल्ह्यांचं प्रादेशिक नियोजन करण्यास ५५ वर्ष लागली. मात्र उर्वरीत ११ जिल्ह्यांचं नियोजन अवघ्या १ वर्षात पूर्ण करण्यात आले. मुंबई शहराला शांघाय बनवायचे नाही तर मुंबईच ठेवायचे आहे. मात्र असं करताना शांघाय मधील चांगल्या गोष्टी इथे करता येतील का हेही पाहिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डीटीपी डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या नगररचना विभागाच्या आकर्षक संकेतस्थळाचं आणि माहिती पुस्तिकेचं आणि नकाशे ऑनलाईन पध्दतीनं देण्याबाबत तयार केलेल्या संगणकीकरणाच्या कामाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading