दिलीप प्रभावळकर यांचा गंधार गौरव पुरस्कारानं सन्मान

बाल रंगभूमीमुळेच आपण एक उत्कृष्ट कलाकार म्हणून घडलो असे उद्गार ज्येष्ठ नाट्यकर्मी दिलीप प्रभावळकर यांनी काल ठाण्यात बोलताना काढले. गंधार कला संस्थेतर्फे बाल नाट्यातील अजोड कामगिरीबद्दल दिलीप प्रभावळकर यांना गंधार गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी प्रकट मुलाखतीत प्रभावळकर यांनी हे उद्गार काढले. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला दीडशेहून अधिक बाल कलाकारांनी मराठी चित्रपट गीतांचा आजवरचा प्रवास रंगमंचावर आपल्या कलाभिनयानं जिवंत केला. आपल्या जीवनात बालनाट्याचा मोठा वाटा आहे. बाल रंगभूमी ही एक प्रयोगशाळा असून इथे कलाकारांमध्ये चांगल्या अभिनयाची बीजं रोवली जातात असं दिलीप प्रभावळकर यांनी सांगितलं. आपल्या आजवरच्या अभिनयातील प्रवासात बाल रंगभूमीचा सर्वात मोठा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्कृष्ट नट होण्यासाठी व्यक्तीमत्व देखणे असणं गरजेचं नसून आपल्या स्वत:तील पैलू ओळखणं गरजेचं आहे. अभिनय करताना स्वत:मधील शक्ती, गुण आणि अभिनयाच्या मर्यादा पाळणे फार महत्वाचे असल्याचा सल्ला प्रभावळकर यांनी यावेळी दिला. आपल्या आशा आकांक्षा मुलांवर लादू नका, त्यांना उमलायला वेळ द्या असा सल्ला दिलीप प्रभावळकर यांनी बाल कलाकारांच्या पालकांना दिला.

Leave a Comment

%d bloggers like this: