थंडीचा कडाका वाढला – थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता

ठाण्यामध्ये गेले दोन दिवस थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. वातावरणातील हा गारवा साधारणत: २ तारखेपर्यंत तरी कायम राहील असं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं. गेल्या दोन दिवसात तापमानात साधारणत: ४ सेल्सिअसनी घट झाल्याचं दिसत आहे. साधारणत: हवीहवीशी वाटणारी थंडी आता अंगाला झोंबू लागली आहे. सर्वसाधारणपणे थंडीमध्ये आपल्याकडे २३ ते २५ सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असतं. पण गेले दोन दिवस तापमानाचा काटा हा १८-१९ सेल्सिअस पर्यंत घसरला आहे. सकाळच्या कडाक्याच्या थंडीमुळे सकाळी फिरायला जाणा-यांच्या संख्येत काहीशी घट दिसत असून डोक्यावर टोपी, अंगात स्वेटर, पायात मोजे आणि हातात हातमोजे घालून फिरताना काही मंडळी दिसू लागली आहेत. साधारणत: १० वाजेपर्यंत हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे. पण दुपारी मात्र तापमानाचा काटा ३०-३१ सेल्सिअस पर्यंत गेल्याचं पहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरातच थंडीची लाट असून देशाबरोबरच ठाणेही गारठलं आहे. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading