तुलसीविवाह ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत, धुमधडाक्यात आणि पारंपरिक रितीरिवाजानुसार साजरा करण्यात आला. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुलसीविवाह करण्याची प्रथा आहे. तुलसीविवाहानंतरच सर्वसामान्यांच्या विवाहाला प्रारंभ होतो. तुळस ही एक पवित्र वनस्पती असून ती भारतात सर्व ठिकाणी आढळते. तुळस हे काम, कर्तव्य, तत्परता, प्रेम आणि सदगुणांचं प्रतिक आहे. महाराष्ट्रात तुळस ही अतिशय पवित्र मानण्यात आली असून यासाठी प्रत्येक माणसाच्या घरात तुळस ही असतेच. विष्णूची पूजा ही तुळशीशिवाय नेहमीच अपूर्ण आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावनाला सजवलं जातं. ऊस, चिंच, आवळा आणि तुळशीच्या फांद्यांनी वृंदावन सजवलं जातं. त्यानंतर लग्नाचा विधी होतो. लग्न झाल्यानंतर दूध-दही पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. अशात-हेनं पारंपरिक पध्दतीनं तुलसीविवाह साजरा करण्याची पध्दत आहे. आता अलिकडे या विवाहाला ख-या विवाहाचं स्वरूप येऊ लागलं आहे. यावर्षी तर रेल्वेच्या डब्यातही तुलसी विवाह संपन्न झाला.
