ठाण्यामध्ये आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा १३६ वा स्मृतीदिन भावपूर्ण वातावरणात संपन्न

ठाण्यामध्ये आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा १३६ वा स्मृतीदिन काल भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक सदाफुले यांनी आद्य क्रांतीकारकांच्या प्रतिमेचं आणि क्रांतीस्तंभाचं पूजन करून अभिवादन केलं. तर शिवसेनेच्या गोपाळ लांडगे यांनी क्रांतीज्योतीचं प्रज्वलन केलं. वासुदेव बळवंत फडके पुण्यात सैन्य लेखा सेवेत भरती झाले. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यांना स्वातंत्र्याचं महत्व पटवून दिलं. यानंतर काही काळातच फडके यांनी सरकारी नोकरीचा त्याग केला आणि ब्रिटीश सरकारविरूध्द सशस्त्र क्रांतीच्या उठावाची तयारी सुरू केली. बहुजन समाजातील रामोशी, धनगर, कोळी आणि तत्सम समाजातील अनेक तरूणांना प्रशिक्षित करून सरकारविरूध्द उठाव आणि खजिन्याची लूट सुरू केली. २० जुलै १८७९ मध्ये त्यांना ब्रिटीश सरकारनं पकडलं आणि त्यांच्या विरोधात आजीवन कारावास आणि तडीपाराची शिक्षा ठोठवली. त्यांना एडनला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्याहून त्यांना ठाण्यात आणण्यात आलं आणि ठाण्याहून भायखळा आणि तिथून एडनला नेण्यात आलं. एडनमध्ये त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला. त्याविरोधात त्यांनी आमरण उपोषण केलं. त्यातच १७ फेब्रुवारी १८८३ मध्ये त्यांचं महानिर्वाण झालं. एकनाथ काजारी आणि त्यांचे सहकारी ठाणे मध्यवर्ती कारागृहात जमून या वीरपुरूषास अभिवादन करतात. कालही एकनाथ काजारी यांच्या आद्य क्रांतीवीर प्रतिष्ठानातर्फे वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन तसंच त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading