ठाणे सहकार न्यायालयाच्या आदेशामुळे सोसायटी पदाधिका-यांच्या मनमानी कारभाराला चाप

आपल्या मनाविरूध्द काम करीत असल्यास त्या सभासदास त्रास देऊन पदावरून हटवण्याच्या सोसायटी पदाधिका-यांच्या मनमानी कारभाराला चाप बसवणारा महत्वाचा आदेश ठाणे सहकार न्यायालयाने नुकताच दिला आहे. मानपाडा घोडबंदर रोडवर राजविलास हवेली कोठी गृहनिर्माण संस्था आहे. यामध्ये २७ बंगले आणि सहा रो-हाऊस तसंच १२४ फ्लॅटसची सोसायटी आहे. या सोसायटीच्या मोकळ्या जागेवर ९९४.५० चौरस मीटर जागा मनोरंजन पार्क साठी राखीव ठेवलेली आहे. बिल्डरकडून फ्लॅट घेताना ही जागा मनोरंजन पार्क, गार्डन म्हणून राखीव दाखवण्यात आली होती. सोसायटीकडून सगळ्या जागेचे डिम्ड कन्व्हेअन्स पूर्ण झाले नव्हते. कायद्यानुसार सोसायटी नोंदणीकृत झाल्यावर सोसायटीच्या परिसरातील जागा सोसायटीच्या मालकीची असते. त्यावर विकासक हक्क सांगू शकत नाही. असे असतानाही विकासक चेतन पारेख यानी या जागेची विक्री अल्मोरी गुप्ता यांना केली आणि त्यांनी या जागेवर बंगल्याचे काम सुरू केले. या सोसायटीच्या खजिनदार वंदना कोळी यांनी जागा विकण्यास तसेच आल्मोरी गुप्ता यांना सभासदत्व देण्यास आक्षेप घेतला. त्यामुळे अध्यक्ष आणि सचिव यानी कोळी यांचा खजिनदार पदाचा कार्यभार काढून घेतला. कोळी यांना पदावरून हटवल्यावर कमिटीने गुप्ता यांना बांधकाम पुढे सुरू ठेवण्यास अनुमती दिली. सोसायटीच्या या निर्णयाविरूध्द वंदना कोळी यांनी सहकार न्यायालयात धाव घेतली. सहकार न्यायालयात कोळी यांच्या वतीने वकील एस. एस. बुटाला यांनी बाजू मांडली. कोळी यांना पदावरून हटवताना सोसायटीच्या पदाधिका-यांनी महाराष्ट्र हौसिंग सोसायटी कायदयातील बाबींची पूर्तता केली नसल्याचे वकील एस. एस. बुटाला यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सहकार न्यायालयाच्या न्यायाधीश  एम. एस. साळी यांनी वंदना कोळी यांना खजिनदार पदावरून हटवण्याच्या समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि त्यांना खजिनदार पदाचा कारभार पुन्हा सोपवण्याचे आदेश दिले. कन्व्हेअन्सची प्रक्रिया न केल्याने मालक सोसायटीला दिलेली जमीन पदाधिका-यांना हाताशी धरून दुसरीकडे विकून पैसा कमावतात याचे हे उदाहरण असून सहकार न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने पदाधिका-यांच्या मनमानीला आळा बसू शकेल असा विश्वास वकील एस. बुटाला यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading