ठाणे रेल्वे स्थानकाचे स्टेशन डायरेक्टर सुरेश नायर यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्या जागी राजेंद्र वर्मा यांची नियुक्ती झाली आहे. मध्य रेल्वे वरील काही महत्वाच्या स्थानकांसाठी डायरेक्टर हे पद रेल्वे प्रशासनानं २ वर्षापूर्वी निर्माण केलं. त्यानुसार नोव्हेंबर २०१७ मध्ये ठाणे रेल्वे स्थानकाच्या डायरेक्टर पदी सुरेश नायर यांची वर्णी लागली होती. अवघ्या वर्षभरात नायर यांनी ठाणे रेल्वे स्थानकात अनेक महत्वपूर्ण कामं केली. स्थानकातील सुरक्षेच्या दृष्टीनं स्थानकात क्लोज सर्कीट कॅमे-यांची संख्या वाढवण्यावर त्यांनी भर दिला होता. आता त्यांना पदोन्नती मिळाली असून त्यांची बदली कोकण रेल्वेच्या कारवार येथील केआरसीएल प्रकल्पावर झाली आहे. त्यांच्या जागेवर राजेंद्र वर्मा यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
