जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची ‘या ‘मी मी’चं काय करायचं?’, या विषयावर प्रकट मुलाखत

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांची ‘या ‘मी मी’चं काय करायचं?’, या विषयावर प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. डॉ. नाडकर्णी यांची ही मुलाखत लेखिका आणि निवेदिका हर्षदा बोरकर घेणार आहेत. बुधवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता ही मुलाखत काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे. मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने, दैनंदिन जीवनातील ताण तणाव यांचा सामना कसा करावा, स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना कोणती पथ्ये पाळावीत आणि मानसिक आरोग्य सृदृढ करण्याबरोबरच ज्यांना मानसिक आजार आहे त्यांच्याप्रती सहवेदना ठेवून कसे आचरण करावे याबद्दल डॉ. आनंद नाडकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. नाडकर्णी हे ठाण्यातील विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. उत्तम प्रज्ञा, तीव्र संवेदनशीलता आणि सकारात्मक वृत्ती यांची देणगी त्यांना लाभली आहे. त्यांनी सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस , आणि के.ई.एम. हॉस्पिटल इथून डिप्लोमा इन सायकॉलॉजिकल मेडिसिन ही पदविका आणि एमडी(मनोविकारशास्त्र) हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. एमडीच्या परीक्षेत मुंबई विद्यापीठाच्या सुवर्णपदकाचे ते मानकरी ठरले. पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच, मानसिक आरोग्य आणि त्यावरील उपचार – या बाबतींत असलेले अज्ञान, पूर्वग्रह आणि, रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यातील अत्यंत विषम प्रमाण, ह्या बाबतींत संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करायला हवेत, हा विचार त्यांच्या मनात रुजला. त्यांच्या अध्यापकांशी होणाऱ्या संवादांतून, तो दृढमूल होऊन १९९० साली इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) ही संस्था उभी राहिली. आज ‘आयपीएच’ ही संस्था मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, ॲमिटी युनिव्हर्सिटी यांचे मान्यताप्राप्त शैक्षणिक केंद्र असून जगभरातील देशांतून अनेक मनआरोग्य व्यावसायिक तिथे अभ्यासार्थ येतात. डॉ. नाडकर्णी एक शैलीदार ललित लेखक, कवी आणि नाटककार, अभिनेता, संगीतकार, तबलावादक, मर्मज्ञ संगीतप्रेमी आणि सूत्रसंचालक, तत्त्वज्ञानाचे कृतिशील अभ्यासक आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यातून सहजतेनं प्रकटतात. त्यांच्या साहित्यकृतींत – वैद्यकसत्ता, किंचित, आरोग्याचा अर्थ, मनोगती, गद्धेपंचविशी, स्वभाव विभाव, शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट, विषादयोग, मितुले आणि रसाळ, हेही दिवस जातील (कादंबरी), जन्मरहस्य (नाटक), त्या तिघांची गोष्ट (नाटक), गेट वेल सून (नाटक), सोबतीने चालताना (नाटक), रंग माझा वेगळा (नाटक) आदिंचा समावेश असून त्यांना महाराष्ट्र शासनाचे साहित्यविषयक पुरस्कार, मसाप पुरस्कार, ‘साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार आदि एकोणीस प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. नाडकर्णी यांना त्यांच्या वैद्यकीय, व्यसनमुक्ती आणि साहित्य ह्या क्षेत्रांतील कारकिर्दीबद्दल विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांत इंडियन मर्चंटस् चेंबरच्या अमृतमहोत्सवी वर्षांतील व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्याबद्दलचा पुरस्कार, ठाणे महापालिकेतर्फे साहित्यविषयक कामगिरीसाठी देण्यात येणारा पी. सावळाराम पुरस्कार, वैद्यकविषयक लेखनाबद्दलचा शतायुषी पुरस्कार, ‘युथ ॲक्टिव्हिस्ट ऑफ द इयर’ हा डॉ. अरुण लिमये स्मृती पुरस्कार, ठाणे नगररत्न पुरस्कार, ठाणे भूषण पुरस्कार, समाजशिक्षक पुरस्कार, आरोग्य ज्ञानेश्वर पुरस्कार आदिंचा समावेश आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading