ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं पोलीस स्मृतीदिनानिमित्त शहीदांना श्रध्दांजली

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं काल स्मृतीदिन पाळण्यात आला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून कर्तव्य करत असताना हुतात्मा झालेल्या पोलीसांना आदरांजली अर्पण केली. २१ ऑक्टोबर १९५९ मध्ये भारत-चीन सीमेवर चीनच्या सैनिकांनी अचानक हल्ला करून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एकूण १० जवानांना ठार मारले. या घटनेची स्मृती म्हणून दरवर्षी २१ ऑक्टोबर हा पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. पोलीसी कर्तव्य पार पाडताना म्हणजे हिंसक जमावाला काबूत आणताना, एखाद्या गुन्हेगाराला पकडताना, कायदा आणि सुव्यवस्था राखताना, अतिरेकी-नक्षलवादी-दहशतवादी कारवाईमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस अधिकारी-जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी हुतात्मा दिवस पाळला जातो. २००९-२०१० मध्ये ७९९ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना आपलं कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली. यामध्ये महाराष्ट्रातील २ पोलीस अधिकारी तर १६ पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. तर २०१०-२०११ या वर्षात ६३४ पोलीस अधिकारी-कर्मचारी शहीद झाले. तर २०११-२०१२ या वर्षात देशभरात ५७४ पोलीस कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. २०१२-२०१३ मध्ये कर्तव्य बजावत असताना ५६७ पोलीस अधिकारी-कर्मचारी शहीद झाले. गेल्या वर्षी देशामध्ये कर्तव्य बजावत असताना ४३४ पोलीस अधिकारी कर्मचारी शहीद झाले होते तर यंदा ४१४ अधिकारी-कर्मचारी शहीद झाले आहेत. यावेळी सर्व शहीद पोलीसांना उपस्थित पोलीसांनी हवेत गोळ्या झाडून मानवंदना देत श्रध्दांजली अर्पण केली.

Leave a Comment

%d bloggers like this: