ठाणे पूर्वतील तोफांचं स्मारक करण्यास चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीचा विरोध

चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीनं पोर्तुगीज काळातील तोफांचं स्मारक उभारण्यास विरोध दर्शवला आहे. ऐतिहासिक स्मारकं झालीच पाहिजेत पण ती आपल्या पूर्वजांनी गाजवलेल्या कार्यकर्तृत्वाची असं चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीचं म्हणणं आहे. ठाण्याच्या पूर्व भागात उलट्या गाडल्या गेलेल्या तोफा सध्या गाजत आहेत. या तोफा कोणी आणि का गाडल्या याचा इतिहास उपलब्ध नाही. चेंदणी कोळीवाडा संवर्धन समितीनं विकासाच्या ओघात होणा-या अधिक्रमणाच्या विरोधात गावठाण संवर्धन समिती स्थापन केली आणि या अनुषंगानं केलेल्या संशोधनातून मीठबंदरवरील तोफांचे कूळ मूळ शोधून काढलं आहे. मीठबंदरावरील या तोफा पोर्तुगीजांच्या आहेत. पोर्तुगीजांनी ठाणे किल्ला बांधल्यावर किल्ल्यावरील बुरूज आणि खाडी किनारी उभारलेल्या पाण बुरूजांवर त्या लावल्या होत्या. या तोफांच्या सहाय्यानं पोर्तुगीजांनी ठाणे खाडीवर आपलं अधिपत्य राखलं होतं. पेशव्यांनी जेव्हा पोर्तुगीजांवर विजय मिळवला तेव्हा ७९ तोफा मराठ्यांच्या हाती लागल्या. किल्ल्याचे बुरूज आणि पाण बुरूजावर असलेल्या त्या तोफांसह पोर्तुगीजांच्या गलबतांवर चढवलेल्या १६ तोफाही मराठ्यांच्या हाती लागल्या होत्या. देशाच्या इतर भागात घेऊन जाण्यासाठी गलबतावर चढवलेल्या या तोफा चेंदणी बंदरावरून हस्तगत करून बंदरावर उतरवण्यात आल्या होत्या. पेशव्यांनंतर आलेल्या इंग्रज राजवटीतही या तोफा विना वापर चेंदणी बंदरावर पडून होत्या. साधारणत: १८व्या शतकाच्या उत्तरार्धात फातेमारी करणा-या चेंदणी कोळी लोकांनी पोर्तुगीज सैन्याचे नाक असलेल्या या तोफा फातेमारी नौका बांधण्यासाठी किना-यावर उलट्या गाडण्याची कल्पकता आणि हिंमत दाखवली होती. चेंदणी बंदराशी निगडीत असलेला दैदिप्यमान इतिहास दुर्लक्षित करत भारतीयांवर परकीय सत्ता लादण्यास सहाय्यभूत ठरलेल्या तोफा परत उकरून त्याचे स्मारक उभारणारे इतिहास प्रेम आगामी पिढीला गुलामगिरीचा इतिहास सांगणार आहे का असा प्रश्न समितीनं उपस्थित केला आहे. ऐतिहासिक स्मारक झालीच पाहिजेत पण ती आपल्या पूर्वसुरींनी गाजवलेल्या कार्यकर्तृत्वाची असं म्हणत चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीनं तोफांचं स्मारक करण्यास विरोध दर्शवला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: