ठाणे पूर्वतील आरोग्यम् रूग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात

ठाणे पूर्वतील आरोग्यम् रूग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडलं आहे. सोमवारी रात्री एका ५४ वर्षीय रूग्णाचा मृत्यू ओढवल्यानं रूग्णाच्या नातेवाईकांसह नागरिकही संतप्त झाल्यामुळं कोपरी परिसरात तणाव निर्माण झाला होता. कोपरीतील आरोग्यम् रूग्णालयामध्ये साईनाथ नगरमध्ये राहणारे प्रकाश घाडगे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे दाखल करण्यात आल्यामुळे दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची ग्वाही रूग्णालयानं दिली होती. मात्र सोमवारी रात्री उपचारादरम्यान अचानक त्यांचा मृत्यू झाला. घाडगे यांच्यावर उपचार करणा-या शिकाऊ डॉक्टरानं नातेवाईकांना उशिरा कळवल्यानं वाद निर्माण झाला. घाडगे यांची प्रकृती सुधारत असताना अचानक त्यांचा मृत्यू झालाच कसा असा संतप्त सवाल करत नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारला. त्यावेळी उपस्थित डॉक्टरांनी विसंगत माहिती दिल्यामुळं हा वाद वाढत गेला. उपस्थित शेकडोच्या जमावानं रूग्णालय बंद करण्याची मागणी केल्यानं या तणावात भर पडली. त्यावेळी कोपरी पोलीसांनी धाव घेतली. पोलीसांच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानं परिसराला छावणीचं स्वरूप आलं. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी रूग्णालयावर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. पोलीसांनी घाडगे यांचं पार्थिव शव विच्छेदनासाठी जे जे रूग्णालयात पाठवलं तसंच क्लोज सर्किट कॅमे-याचं चित्रीकरणही पोलीसांनी ताब्यात घेतलं.

Leave a Comment

%d bloggers like this: