देशातील महान क्रांतीकारकांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आलं ती जागा काही महत्वाच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा प्रस्ताव आहे. ठाणे कारागृह प्रशासनानं शासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठवला आहे. ठाणे कारागृहात अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे, कृष्णाजी कर्वे या तिघांना फाशी देण्यात आलं होतं. नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या करण्याप्रकरणी या तिघांना ठाणे कारागृहात फाशी देण्यात आलं होतं. ही जागा काही महत्वाच्या दिवशी सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुली करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे ठाणे कारागृहाच्या भिंतीवर म्युरल उभारलं जाणार आहे. या म्युरलवर पोर्तुगीजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यापासून मराठ्यांनी या किल्ल्याची मुक्तता केली तोपर्यंतच्या घटना चित्रीत केल्या जाणार आहेत. एकेकाळच्या भुईकोट किल्ल्याचं इंग्रजांनी कारागृहात रूपांतर केलं आहे. ४४ एकरवर हा किल्ला असून त्यापैकी साडेतेरा एकर जागेत कैद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे कारागृहातील महान क्रांतीकारकांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आलं ती जागा राष्ट्रीय महत्वाचे दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, हुतात्मा दिन अशा दिवशी सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा प्रस्ताव आहे. ही जागा सुरक्षित करून स्वतंत्र प्रवेशद्वारा द्वारे खुली केली जाणार आहे. ही जागा खुली करताना कारागृहाच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून अभ्यागतांना प्रवेश देतानाही त्यांची तपासणी करण्याचा प्रस्ताव आहे. शासनानं या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सर्वसामान्यांनाही क्रांतीकारकांना फाशी दिलेल्या जागेला भेट देता येणार आहे.
