जिल्ह्यामध्ये ६५ लाखाहून अधिक मतदार – पूर्णत: दिव्यांग संचलित मतदान केंद्र निर्माण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून ठाणे जिल्ह्यामध्ये पाचव्या टप्प्यात म्हणजे २० मे रोजी मतदान होणार आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीविषयी माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २६ एप्रिलला निवडणुकीची आचारसंहिता जारी होणार असून ३ मे पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील तर ६ मे ला ही नामनिर्देशन पत्र मागे घेता येतील. २० मे रोजी मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली. जिल्ह्यामध्ये ६५ लाख १ हजार ६७१ इतकी मतदारांची संख्या आहे. यामध्ये ३५ लाख ६ हजार ८२ पुरूष तर ३९ लाख ९४ हजार ३१५ महिला मतदार असून १ हजार २७२ तृतीयपंथी मतदार आहेत. जिल्ह्यामध्ये ६ हजार ५९२ मतदान केंद्र यासाठी असतील. तर ४२ हजाराहून अधिक कर्मचारी वृंद तैनात करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज असून आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचं कामही सुरू करण्यात आलं आहे. याअंतर्गत बॅनर, फलक हे काढण्याचं काम सुरू असल्याचं अशोक शिनगारे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवाराला खर्चाची कमाल मर्यादा ही ९५ लाख इतकी आहे. यंदाच्या निवडणुकीत महिलांचं प्रमाण मतदानामध्ये वाढावं यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निवडणुकीत जास्तीतजास्त मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावावा असं आवाहनही जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केलं. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा निहाय मतदारसंघात एकतरी संपूर्ण महिलांनी चालवलेलं मतदान केंद्र असणार आहे. त्याचप्रमाणे पूर्ण युवा वर्गानं कार्यान्वित केलेलं मतदान केंद्र असणार असून यावेळी प्रथमच संपूर्णत: दिव्यांगांनी संचलित मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न असल्याचं अशोक शिनगारे यांनी सांगितलं.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading