आपले सैनिक सीमेवर खडा पहारा देत असल्यामुळे आपण सुखी जीवन जगत असतो. या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वजदिन निधी संकलन होय. त्यामुळं या निधी संकलनाकडे एरवीच्या एखाद्या उद्दिष्टपूर्ती मोहिमेसारखे पाहू नये आणि अधिकाधिक निधी जमा करावा असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन २०१८ चा शुभारंभ जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. ध्वजदिन निधीसाठी गेल्या वर्षभरात १ कोटी ८४ लाखांचं उद्दिष्ट होतं. त्यापैकी ८५ टक्के म्हणजे १ कोटी ५८ लाखांचा निधी गोळा झाला. उत्तम निधी संकलनाबद्दल उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी तसंच इतर अधिका-यांना यावेळी गौरवण्यात आलं. माजी सैनिकांच्या आरोग्य योजनेबाबत लागणा-या जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. यावेळी प्राणाची आहुती देणा-या शूरवीर जवानांच्या स्मृतीला वंदन करण्यात आलं. तर वीरमाता आणि वीरपत्नींचाही सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात युनिटी फौंडेशनचे दिलीप गुप्ते यांनी संकलित आणि संपादित केलेल्या महारथी या पुस्तकाचं प्रकाशनही जिल्हाधिका-यांच्या हस्ते झालं. या पुस्तकात महाराष्ट्रातील १०८ शौर्य सन्मानप्राप्त सैनिकांच्या शौर्यगाथा शब्दबध्द करण्यात आल्या आहेत. या शौर्यगाथा प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत असल्यानं प्रेरणादायी ठरतील तसंच सैनिक संरक्षणासाठी जीवाची कशी बाजी लावतात हेही कळेल असं दिलीप गुप्ते यांनी सांगितलं.
