गेल्या काही वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या हाली बरफच्या मदतीस धावलं जिल्हा प्रशासन

राष्ट्रीय वीरबाला पुरस्कार मिळालेली हाली बरफ गेल्या काही वर्षापासून काहीशी दुर्लक्षित होती. मात्र महात्मा गांधी जयंती निमित्तानं तिचं नशीब पुन्हा एकदा उजळलं असून तिला आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकरांनी दिले आहेत. शहापूर तालुक्यातील नांदगावच्या जमना पाड्यातील १५ वर्षीय हाली बरफनं २०१२ मध्ये न घाबरता बिबट्याच्या तावडीतून आपल्या बहिणीची सुटका केली होती. त्यामुळं तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते हाली बरफला राष्ट्रीय वीरबाला शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पुरस्कार दिल्यानंतर मात्र तिच्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष झालं होतं. गेली काही वर्ष ती एका पडक्या झोपडीत राहून आपल्या तीन मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करत होती. याची माहिती मिळताच श्रमजीवी संस्थेचे संस्थापक विवेक पंडीत यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले. जिल्हाधिका-यांनीही तात्काळ याची दखल घेत तिच्या पराक्रमाचा योग्य तो सन्मान होण्याच्या दृष्टीनं तिला आवश्यक ती सर्व शासकीय मदत देण्याचे आदेश दिले आहेत. या वीरबालेचा शौर्याचा गौरव करणारा धडा चौथीच्या अभ्यासक्रमात आहे. यामध्ये तिने तिच्या भाषेत नोकरीची मागणी केली होती. मात्र गेली ५ वर्ष ती दुर्लक्षित राहिली. ५ वर्षापूर्वी माहेरपणाला आलेली आपली मोठी बहिण शकुंतला बोडगे हिच्याबरोबर सरपण आणण्यासाठी म्हणून ती तानसा अभयारण्यात गेली होती. त्यावेळी शकुंतलावर अचानक बिबट्यानं हल्ला केला. तो तिला उचलणार हे पाहताच प्रसंगावधान राखत हाली बरफनं जीवाच्या आकांतानं बिबट्यावर जबरदस्त दगडफेक केली आणि आरडाओरड करत बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. हालीच्या या धैर्याचं त्यावेळी कौतुक झालं. तिला राष्ट्रीय वीरबाला म्हणून सन्मानही मिळाला. पण कुटुंबियांसाठी अंत्योदय शिधापत्रिका मिळवण्यासाठी तिला दारोदार भटकावं लागलं. याची माहिती मिळताच विवेक पंडीत यांनी जिल्हाधिका-यांच्या ही बाब निदर्शनास आणली. जिल्हाधिका-यांनीही त्वरीत हालचाल करत तिला एका दिवसात अंत्योदय शिधापत्रिका, जातीचा दाखला आणि आधारकार्ड मिळवून दिलं. जिल्हाधिका-यांनी तिला शबरी योजनेतून घर देता येईल का याबाबत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासन तिच्या नव-याला नोकरी मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करत आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading