गेल्या काही दिवसात हवेतील गारवा वाढला असून गुलाबी थंडीचा अनुभव

गेल्या काही दिवसात हवेतील गारवा वाढला असून ठाणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव मिळत आहे. पावसाळ्यानंतर काही दिवस उष्म्यानं हैराण केलं असतानाच थंडीचा खेळ सुरू झाला होता. सकाळी थंडी आणि दुपारी उकाडा असं वातावरण होतं. मात्र गेल्या ३-४ दिवसात थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याचं दिसत आहे. सकाळी चालायला जाणारे कानटोपी, मफलर, स्वेटर, शाल अशा पेहरावात दिसत आहेत. काही ठिकाणी सकाळच्या वेळी शेकोट्याही पेटवलेल्या दिसत आहेत. हवेतील गारवा वाढण्याबरोबरच सर्दी खोकल्यामध्येही वाढ झाल्याचं दिसत आहे. थंडीच्या दिवसात संधीवात डोकं वर काढतो. पूर्वी वयाच्या पन्नाशीनंतर दिसून येणारा हा आजार आता चाळीशीतही पहायला मिळत आहे. हिवाळी ऋतू  हा अनेक जुनी दुखणी व्याधींना निमंत्रण देणारा असतो. सांधेदुखीच्या रूग्णांना हवेतील गारव्याचा जास्त त्रास होतो. वातावरणात दाटलेले धुके आणि सकाळचा गारवा हे खासकरून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये आजार बळावण्याचं प्रमुख कारण आहे. थंड हवेमुळं डोळे जळजळणे, गुदमरल्यासारखे वाटणे, घश्याला खवखव, शिंका असा त्रास अनुभवायला येतो. थंडी हवीहवीशी वाटली तरी प्रकृतीच्या अनेक कटकटीही या काळात वाढलेल्या जाणवतात.

Leave a Comment

%d bloggers like this: