ग दि माडगूळकर आणि सुधीर फडके यांची गीतरामायण ही निर्मिती म्हणजे मराठी संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. गीतरामायणाने मराठी भावविश्वात अढळ स्थान निर्माण केलं आहे असे गौरवोद्गार प्राध्यापक अरूण नूलकर यांनी काढले. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत युगनिर्माते गदिमा आणि बाबूजी शताब्दी नमन या विषयावर ते बोलत होते. ग दि माडगूळकर यांचा कथा, ललित नाट्य, चित्रपट, काव्य, भाषण, कथालेखन, संवाद, गीते अशा साहित्याच्या सर्व क्षेत्रात संचार होता. महत्वाचे म्हणजे संदर्भासाठी रामायणाचे कोणतेही पान न उलगडता गीतरामायणाचे पहिले गीत गदिमांनी लिहिले ही बाब उल्लेखनीय आहे तर सुधीर फडके यांनी काळानुसार बदलणारे संगीत दिले. गीतरामायणासाठी दिलेलं संगीत हे अजरामर होते म्हणूनच गदिमा आणि बाबूजींनी गीतरामायण हे केलेलं नाही तर झालेलं आहे असे म्हणणे सार्थ असल्याचं मत अरूण नूलकर यांनी व्यक्त केले. इंग्रजीचा संस्कार नसलेल्या देवळातल्या नाईट स्कूलमधून शिकलेल्या गदिमांनी साध्या, सरळ आणि सोप्या काव्यातून अजरामर गीतरचना केली. माझिया प्रियेचे झोपडे यासारख्या भावगीतातील शब्दातून त्यांनी हुबेहूब चित्र उभे केले. बुगडी माझी सांडली गं सारख्या लावणीतून संयत लावणी त्यांनी रचली. नाच रे मोरा सारखे बालगीत, हे राष्ट्र देवतांचे सारखे देवभक्तीपर गीत अशी १५७ मराठी आणि २५ हिंदी चित्रपटांसाठी गाणी गदिमांनी लिहिली. गदिमा हे विलक्षण प्रतिभेचे कवी होते असं प्रतिपादन नूलकर यांनी केलं. प्रभात या चित्रपट कंपनीसाठी बाबूजींनी संगीत दिग्दर्शन केले. वंदे मातेरम् या चित्रपटातून त्यांचे नाव झाले. आपल्या ४० वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ८० ते ८५ चित्रपटांना संगीत दिलं. अनेक थोर गायकांनी त्यांना आपले गुरू मानले तर महम्मद रफी यांनी बाबूजींच्या लग्नात चक्क मंगलाष्टका म्हटली इतका त्यांचा महिमा थोर होता. गोवा मुक्ती संग्राम, दादरा-नगर-हवेली मुक्तीसंग्राम यात त्यांचा सहभाग होता. बाबूजी दुस-याची चाल गातना विनम्र विद्यार्थी तर स्वत:ची चाल बसवताना शिस्तबध्द मास्तर असत. म्हणूनच गदिमा आणि बाबूजी हे आपल्या सुवर्णकाळाचे शिल्पकार आहेत असे भावोद्गार प्राध्यापक अरूण नूलकर यांनी काढले.
