कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ शहरात अनेक महत्वकांक्षी प्रकल्प

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ शहरात अनेक महत्वकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत. यातील बहुतेक प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे येत्या काही दिवसात लोकार्पण होणार आहे. अंबरनाथ शहरात सुरु असलेल्या या विकासकामांची खासदार शिंदे यांनी  पालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत आढावा घेतला. यावेळी सर्व विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी खासदार शिंदे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी चिंचपाडा येथे उभारण्यात आलेल्या ग्रंथालयाचे खासदार शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. अंबरनाथ शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प आणि संयुक्त घनकचरा प्रकल्पाच्या कामांचा खासदार शिंदे यांनी आढावा घेतला आणि ही कामे प्रत्यक्ष सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर शहरातील सर्व रस्त्यांवर पथदिवे बसविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. खासदार  श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते चिंचपाडा ग्रंथालयाचे लोकार्पण करण्यात आले. ८० लाख रुपयांच्या निधीतून या ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली असून यामध्ये तब्बल १ लाख पुस्तक क्षमता आहे. मराठी तसेच इंग्रजी भाषेची साहित्य, कला, क्रिडा संस्कृती, इतिहास, भुगोल, राज्यशास्त्र इत्यादी विषयातील अनेक दुर्मिळ ग्रंथ तसेच गेल्या ५० वर्षातील साप्ताहिके आणि मासिकांचा संग्रह या ग्रंथालयात आहे. ग्रंथालयाच्या वास्तूत दर महिन्याला साहित्यिक परिसंवाद, चर्चासत्रे आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेची नवीन भव्य प्रशासकीय इमारत ४५ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येत आहे. या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीचे अंतर्गत सजवाटीचे कामही प्रगतीपथावर आहे. तसेच या इमारतीची व्याप्ती वाढविण्यासाठी अधिकचे दोन मजले उभारण्यात येत आहेत. या इमारतीची पाहणी करत काम गतीने करण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या. अंबरनाथ पश्चिम येथील वुलन चाळ परिसरात ३  कोटी रुपयांच्या निधीतून तीन मजली रात्र निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. शहरातील बेघरांना या ठिकाणी निवाऱ्याची हक्काची जागा उपलब्ध झाली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील नागरिकांची सांस्कृतिक गरज भागविण्यासाठी शहराच्या पश्चिम भागात असणाऱ्या सर्कस मैदान येथे अत्याधुनिक नाट्यगृहाची उभारणी करण्यात येत आहे. सुमारे ३८ कोटी रुपयांच्या निधीतून या नाट्यगृहाची उभारणी करण्यात येत असून याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसात याचे काम पूर्ण होऊन नागरिकांना आपल्या शहरातच दर्जेदार कलाकृतींचा अनुभव घेता येणार आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading