कल्याण येथील नांदिवली येथे १० हेक्टर जागेवर ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार झाले असून प्रादेशिक परिवहन विभागातर्फे या ठिकाणी अद्ययावत संगणकीय चालक चाचणी पथ, अद्ययावत वाहन तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे असं प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितलं. या परिसराची परिवहन आयुक्त शेखर चन्ने, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. दळवी यांनी पाहणी केली. उच्च न्यायालयानं एका याचिकेचा निकाल देताना परिवहन वाहनाच्या तपासणीसाठी अडीचशे मीटर ब्रेक चाचणी पथ आवश्यक केलं होतं. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनांची नोंदणी झाली आहे. रस्ता सुरक्षा हा एक ज्वलंत प्रश्न असून रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वाहन तपासणी तसंच चाचणीकरता शाश्वत सुविधा उपलब्ध असणं आवश्यक होतं त्यानुसार आरक्षित असलेल्या कल्याण येथील नांदिवलीमध्ये १० हेक्टर जागेवर अडीचशे मीटर लांबीचे ५ ब्रेक टेस्ट ट्रॅक प्रस्तावित असून ३ ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार आहेत. उर्वरित २ ब्रेक टेस्ट ट्रॅक १५ डिसेंबर पर्यंत पूर्ण होतील अशी माहिती जितेंद्र पाटील यांनी दिली.
