कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान असलेला पत्रीपूल उद्या तोडला जाणार असून यासाठी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत या मार्गावर एकही उपनगरीय आणि लांबपल्ल्याची गाडी धावणार नाही. मेगाब्लॉक दरम्यान कल्याण, कर्जत, कसारा या दरम्यानच्या सेवा सुरू राहतील. छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे आणि डोंबिवली दरम्यानच्या सेवाही वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातर्फे मेगाब्लॉक दरम्यान अतिरिक्त बस सेवा दिली जाणार आहे. मनमाड एलटीटी – मनमाड एक्सप्रेस, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मनमाड-राज्यराणी एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या उद्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तर काही गाड्या पुणे आणि नाशिकवरून वळवण्यात आल्या आहेत अशी माहिती रेल्वेनं एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
