मराठा समाजाला आरक्षण देणं म्हणजे ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी आहे. तसंच ओबीसींची फसवणूक आहे. सरकारच्या या निर्णयाविरूध्द असंतोष प्रकट करण्यासाठी उद्या आझाद मैदान येथे आक्रोश आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी संघर्ष समन्वय समितीनं दिला आहे. मराठा समाजाला ओबीसी दर्जा देण्याच्या उद्देशानंच आयोगाचे गठन विशिष्ट पध्दतीनं केलं गेलं. आयोगाच्या सदस्यांच्या नेमणुका, आयोगाची कार्यपध्दती, मागासलेपणासाठी लावण्यात आलेले निकष तसंच आयोगावरील मराठा आंदोलनाचा राज्य शासनाचा दबाव यांचा आयोगाच्या अहवालावर विपरीत परिणाम झाला असून हा अहवाल ओबीसी विरोधी असल्याचा आरोपही यावेळी संघर्ष समन्वय समितीनं केला. ज्या संस्थांच्या सर्वेक्षणाच्या आधारावर अहवाल तयार केला गेला त्यामध्ये एकही संस्था ओबीसी समाजाची नव्हती. मराठ्यांच्या ओबीसीमधील समावेशाला ओबीसी समाज कधीही मान्य करणार नाही. तसंच राज्य शासनानं हक्कांवर गदा आणल्यास त्यांना तीव्र असंतोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा यावेळी ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे देण्यात आला.
