उद्याच्या जागतिक चंद्र महोत्सव दिनानिमित्त दुर्बिणीतून चंद्र पाहण्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांचं आवाहन

२० ऑक्टोबर हा दिवस जगभर जागतिक चंद्र महोत्सव दिन म्हणून पाळला जाणार आहे. उद्या अनेक देशातील खगोल अभ्यासक चंद्राकडे दुर्बिण रोखून चंद्राचं निरिक्षण करणार असल्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. नासा प्लॅनेटरी सोसायटी ल्यूनर आणि प्लॅनेटरी इन्स्टीट्यूटतर्फे जगातील सर्व खगोल अभ्यासकांना दुर्बिणीतून चंद्राचं निरिक्षण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईत उद्या दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी चंद्रोदय होईल तर उत्तररात्री ३ वाजून ३३ मिनिटांनी चंद्र अस्त होईल. त्यामुळे काळोख पडल्यापासून उत्तररात्री ३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत चंद्र निरिक्षण करता येईल. सप्तमी, अष्टमीचा चंद्र हा दुर्बिणीतून निरिक्षण करण्यात खूप मजा असते. कारण त्या दिवशी चंद्रबिंब अर्ध प्रकाशित असल्यानं चंद्राच्या पृष्ठभागावरची विवरे चांगली निरिक्षण करता येतात. दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात फर्स्ट क्वार्टरचा चंद्राच्या म्हणजे सप्तमी अष्टमी जवळच्या शनिवारी असा चंद्रनिरिक्षणाचा महोत्सव आयोजित केला जातो. २० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवलं. पुढच्या वर्षी २० जुलैला या घटनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. पुढच्या वर्षी १५ ऑगस्टला भारताच्या इस्त्रो या अंतराळ संशोधन संस्थेलाही ५० वर्ष होत आहेत. पुढच्या वर्षी भारताचे चंद्रयान २ हे चंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे दुर्बिण आहे त्यांनी उद्या रात्री आपली दुर्बिण चंद्राकडे रोखून चंद्र पृष्ठभागावरची विवरे निरिक्षण करावीत आणि जागतिक चंद्र महोत्सवामध्ये सामील व्हावं असं आवाहन खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी केलं आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: