प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ काल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात १० कुटुंबांना हेल्थ कार्डचं वाटप करण्यात आलं. सरकारी कर्मचा-यांना वैद्यकीय सुविधांसाठी संरक्षण असते. आरोग्य विमाचे हप्ते भरणा-यांनाही ते मिळते. पण गरीब आणि दुर्बल घटकाला वैद्यकीय मदतीची गरज भासली तर पैशाअभावी त्यांना उपचार मिळू शकत नाहीत. पण आयुष्य भारत योजनेमुळं संपूर्ण देश निरोगी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याच्या भावना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. या योजनेत ११ कोटी कुटुंबांना हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे असंही जावडेकर यांनी सांगितलं. कोणत्याही शहराचा हॅपी इन्डेक्स हा केवळ शहरातील इमारती, सुविधा यावर मोजता येत नाही तर तेथील नागरिकांचे आरोग्य कसे आहे यावरही अवलंबून असतो असं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ८३ हजार ८९३ तर शहरी भागातील २ लाख ६५ हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत १ हजार १२२ आजारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेतील कुटुंबांना आरोग्यासाठी प्रतिवर्षी ५ लाखाचे विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना ई-कार्ड दिलं जाणार आहे.
