आपल्या कारकिर्दीत शहरात एक उत्तम वस्तु संग्रहालय उभे करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू – जिल्हाधिकारी

आपण इतिहासाचा विद्यार्थी असून ठाणे शहर हे ऐतिहासिक शहर आहे. आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या कारकिर्दीत या शहरात एक उत्तम वस्तु संग्रहालय उभे करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू अशी ग्वाही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. कोकण इतिहास परिषद, आनंद विश्व गुरूकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेत बोलताना जिल्हाधिका-यांनी ही ग्वाही दिली. ठाण्यामध्ये पूर्वी सातत्यानं व्याख्यानं व्हायची आणि चांगल्या वक्त्यांची ऐकण्याची संधी त्यामुळे आपणास मिळाली. आज इतिहास कालबाह्य झाला आहे असा समज असला तरी ते सत्य नाही. एकदा आकाशात झेप घ्यायचं ठरवलं की त्या आकाशाची उंची किती आहे याचा विचार करू नका, ते गाठायचे ठरले तर ते निश्चित गाठा असं सांगत जिल्हाधिका-यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनुभव कथन केले. इतिहास आणि मराठी हे दोन आवडीचे विषय होते. जेव्हा या विषयांकडे वळलो तेव्हा ध्यास निर्माण झाला. १२ ते १४ तास या विषयांचा अभ्यास करू लागलो. त्यानंतर इतिहासात एम.ए करायचे ठरवले. याच विषयात पीएचडी करण्यासाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्तीही मिळाली. पण दुर्दैवानं पीएचडी करण्याची आपली इच्छा अपूर्ण राहिली. परंतु ती आता ठाण्यात आल्यावर ती इच्छा पूर्ण करायला हरकत नाही असंही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केलं. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. अनंत देशमुख यांनी १८१८ ते १८५७ या ३९ वर्षात मुंबईवर १५ गव्हर्नरनी कसा कारभार केला, त्यामुळे येथील जीवनावर प्रभाव टाकणारे मुलभूत होत गेले याचे खुमासदार शैलीत त्यांनी विवेचन केले. इंग्रजांचा अंतस्थ हेतू कळल्यावर मात्र जनता मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विरोधात उभी राहिली आणि लढा सुरू झाला असंही देशमुखांनी सांगितलं. कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रविंद्र लाड यांनी ठाण्याला अडीच हजार वर्षाचा दैदीपम्यान इतिहास लाभला असून तो वाया जाऊ नये म्हणून ठाण्यामध्ये एका चांगल्या वस्तुसंग्रहालयाची आवश्यकता व्यक्त केली.

Leave a Comment

%d bloggers like this: