महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी काल मध्यरात्रीच्या सुमारास पलावा सिटीजवळ फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास डायघर पोलीस स्टेशनजवळ पलावा सिटीकडून कल्याण फाट्याकडे जाणा-या रस्त्यावर शीळ फाटा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी फुटली. ही जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचं भव्य कारंजं उडत होते. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. जलवाहिनी फुटल्याचं कळताच तातडीनं या जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. महामंडळाच्या कर्मचा-यांनी फुटलेली जलवाहिनी दुरूस्त करण्याचं काम हाती घेतलं आहे.