सीकेपी बँकेला ३ महिन्यात ठेवीचे पैसे देण्याचे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे आदेश

संचालकांच्या गैरव्यवहारामुळे बंद पडलेल्या सीकेपी बँकेला ३ महिन्यात ठेवीचे पैसे देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचानं दिले आहेत. कल्याणमधील खडकपाडा येथील डॉ. वत्सला वैद्य यांनी सीकेपी बँकेमध्ये ५ लाख रूपयांच्या ठेवी १८ महिन्यांसाठी ठेवल्या होत्या. या ठेवीवर मिळणारं व्याज त्यांच्या बचत खात्यात जमा होत होतं. ठेवीची मुदत संपल्यानंतर आणि मुलाच्या लग्नासाठी रक्कम हवी असल्यामुळे ठेवीचे पैसे वैद्य यांनी बँकेकडे मागितले होते. बँकेनं त्यांना ५ लाखांची पे ऑर्डर दिली. मात्र बँकेला व्यवहार करता येत नसल्यामुळं ही पे ऑर्डर वटली नाही. त्यामुळं वैद्य यांनी या प्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली. ठेवीचे ५ लाख रूपये, त्यावर १८ टक्क्यानं व्याज, मानसिक त्रासाचे २ लाख रूपये आणि कायदेशीर खर्चापोटी २५ हजार रूपये मिळावे अशी त्यांची मागणी होती. बँकेचे व्यवहार गोठवण्यात आल्यामुळं बँकेला पैसे देता येत नसल्याचं सीकेपी बँकेनं जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर मांडलं. मात्र ग्राहक सेवा हे बँकेचे काम असून त्यातील त्रुटीमुळे वैद्य यांना त्रास झाल्याचं मान्य करत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचानं ५ लाख रूपये त्यावर दरवर्षी १० टक्के व्याज, मानसिक त्रास आणि कायदेशीर कारवाईचा खर्च म्हणून ३५ हजार रूपये देण्याचे आदेश सीकेपी बँकेला दिले.

 

Leave a Comment

%d bloggers like this: