सामाजिक दुष्प्रवृत्तीमुळे समाजातील प्रत्येक माणूस नाडला जात आहे. आपल्याला स्वराज्य मिळालं असलं तरी सुराज्य मिळालं नाही. समस्यांच्या विरोधात मी एकटा काय करू शकतो हा विचार त्यागून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन लोकांनी आता संघटित झालं पाहिजे असं आवाहन हिंदू जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी केले. दैनिक सनातन प्रभातचा १९व्या वर्धापन दिन सोहळ्यात सामाजिक दुष्प्रवृत्ती आणि सुराज्य स्थापनेची आवश्यकता या विषयावर ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सनातन प्रभातच्या वर्धापन दिन विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हवाई आक्रमणानंतर एका राजकीय व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी काही वृत्तपत्रांनी पाकिस्तानची बाजू घेत थेट भारतीय लष्कराच्या कारवाईविषयी शंका उपस्थित केल्या. मात्र हे टाळून पत्रकारितेने देशभक्ती जपायला हवी असं प्रतिपादन डॉ. परिक्षित शेवडे यांनी केले. तर राष्ट्रधर्मावरील आघातांचे वैचारिक खंडन करण्याची आवश्यकता सनातन प्रभातच्या अरविंद पानसरे यांनी व्यक्त केली.
