मकरसंक्रांती अशुभ नाही – दा. कृ. सोमण

एखादी वाईट घटना घडली की संक्रांत आली असं म्हणण्याची प्रथा आहे. परंतु ही प्रथा चुकीची आहे. मकरसंक्रांत म्हणजे सूर्याने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे, हे वाईट कसे असू शकेल ? मकरसंक्रांतीपासून दिनमान वाढत जाते ही तर चांगली गोष्ट आहे. मग मकरसंक्रांती अशुभ कशी असू शकेल? म्हणून मकरसंक्रांत ही वाईटही नाही आणि अशुभही नाही असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी मकरसंक्रांतीविषयी अधिक माहिती देताना सांगितले. येत्या सोमवारी १४ जानेवारीला रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. या मकरसंक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार १५ जानेवारी रोजी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत आहे. संक्रांती पुण्यकालात नवे भांडं, गायीला घास, अन्न, तीळ भरलेलं भांडं, तीळ, लोकरीचे वस्त्र, तूप, सोने, भूमी, गाय, कपडे इत्यादी उपयुक्त वस्तू गरजूंना दान म्हणून द्यावात असं सांगण्यात आलं आहे. मकरसंक्रांतीच्या दिवसात चुकीच्या अफवा पसरवल्या जातात. मकरसंक्रांत ही वाईटही नसते आणि अशुभही नसते त्यामुळं संक्रांतीला घाबरण्याचं कारण नाही. उलट मकरसंक्रांत आनंदाने साजरी करावी. कोणाशी मतभेद, भांडण अथवा अबोला धरला असेल तर मकरसंक्रांतीच्या दिवशी त्या व्यक्तीला तीळगूळ घ्या गोड गोड बोला असं सांगून मकरसंक्रांतीच्या दिवसापासून हितसंबंध सुधारता येतात. इतरांना क्षमा करा आणि झाले गेले विसरून जा अशी शिकवण मकरसंक्रांतीचा सण आपल्याला देत असतो असं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. हिंदूंचे सर्व सण तिथीवर आधारलेले असताना मकरसंक्रांती १४ जानेवारीलाच येते असा काही जणांचा समज आहे तो चुकीचा आहे. सूर्याने एकदा मकर निरयन राशीत प्रवेश केल्यापासून तो पुन्हा मकर राशीत प्रवेश करेपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटं आणि १० सेकंद एवढा कालावधी लागतो. शतकपूर्तीच्या अंकास ४०० ने भाग जात नसेल तर ते लिप वर्ष धरलं जात नाही त्यामुळं दर ४०० वर्षांनी मकरसंक्रांतीचा दिवस ३ दिवसांनी पुढे जातो तसंच दरवर्षीचे ९ मिनिटं १० सेकंद हा काळ साठत दर १५७ वर्षांनी मकरसंक्रांतीचा दिवस आणखी १ दिवसानं पुढे जातो. सन २०० मध्ये निरयन मकरसंक्रांती २२ डिसेंबरला येत होती. १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली. तर १९७२ पर्यंत मकरसंक्रांती १४ जानेवारीला येत होती. आता ती २०८५ पर्यंत कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येईल. २१०० पासून मकरसंक्रांती १६ जानेवारीला येईल. अशारितीने ती पुढे सरकत सरकत सन ३२४६ मध्ये १ फेब्रुवारीला येईल असे सोमण यांनी सांगितलं. पुढील वर्षी मकरसंक्रांती १५ जानेवारीला येणार असल्याचंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading