मकरसंक्रांत आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. एकमेकांना तीळगूळ देऊन, तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला अशा शुभेच्छा देऊन मकरसंक्रांत साजरी करण्यात आली. आज सुर्योदयापासुन सुर्यास्तापर्यंत मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ होता. देशामध्ये प्रत्येक राज्यात मकरसंक्रांतीचा हा सण वेगवेगळ्या पध्दतीनं साजरा होत असतो. तसंच हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानी ओळखला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश आणि गोव्यामध्ये हा सण मकरसंक्रांत म्हणून ओळखला जातो. तमिळनाडू आणि पॉण्डेचेरीमध्ये थाई पोंगल या नावानं, पंजाब, हरियाणामध्ये लोहरी, गुजरात, दिव-दमण मध्ये उत्तरायण म्हणून ओळखला जातो. बिहार, यूपी, उत्तराखंडमध्ये संक्रांत आणि मंक्रांत म्हणून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. कर्नाटकच्या काही भागात सुगी हब्बा म्हणूनही या सणाला ओळखलं जातं. हिमाचल प्रदेशमध्ये हॅप्पी माघ साजी असे म्हणून एकमेकांना शुभेच्छा देतात. ओडिसा मध्ये मकर चौला, पूर्वांचलमध्ये किचेरी, आसाममध्ये माघ बिहु तर काश्मीरमध्ये शिशुर संक्रांत या नावानं मकरसंक्रांतीच्या सणाला ओळखलं जातं अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक परिवारातर्फे आमच्या दर्शकांना मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा.
