ठाण्यामध्ये पु.ल.देशपांडेंच्या जन्मशताब्दीनिमित्त २६ जानेवारीला शतकोटी पु.ल कार्यक्रमात सलग १६ तास विनोदाचा जागर

अजेय या संस्थेतर्फे महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुलोत्सवात १०० विनोदी अभिवचनांचा नजराणा सादर केला जाणार आहे. एका पत्रकार परिषदेत पुलोत्सवाचे निर्माते गौरव संभूस यांनी ही माहिती दिली. येत्या २६ जानेवारी रोजी मराठी ग्रंथसंग्रहालयात सलग १६ तासांचा हा शतकोटी विनोदाचा जागर आयोजित करण्यात आला असल्याचं संभूस यांनी सांगितलं. या कार्यक्रमाची मूळ कल्पना लेखक-दिग्दर्शक डॉ. क्षितीज कुलकर्णी यांची आहे. या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला असून १०० हून अधिक अभिवाचकांचा टप्पा पार झाला आहे. या कार्यक्रमात पु.लंच्या साहित्याबरोबरच इतर लेखकांचे आणि अगदी स्वलिखित साहित्यही उपस्थितांना ऐकायला मिळणार आहे. या कार्यक्रमात शिरिष कणेकर, अरविंद दोडे आदी मान्यवर लेखक सहभागी होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९९३०१ ७५५२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: