ठाणे रेल्वे स्थानकाचा व्यापारी संकुल उभारून होणार विकास

ठाणे रेल्वे स्थानकाचं रूपडं लवकरच बदललं जाणार असून वाशी रेल्वे स्थानकाप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानकातही व्यापारी संकुल उभारलं जाणार आहे. ए-वन, ए-टू दर्जाची रेल्वे स्थानकं खाजगी विकासकांकडून विकसित करण्यासाठी ९९ वर्षाच्या भाडेपट्टीनं देण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. यामध्ये ठाणे रेल्वे स्थानकाचाही समावेश असून ठाणे रेल्वे स्थानकात व्यापारी संकुल उभारून त्याचा विकास केला जाणार आहे. ठाणे महापालिकेनं या प्रस्तावाला मंजुरी दिली असून तो आता शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या रेल्वे स्थानकांना अतिरिक्त चटई क्षेत्र देऊन त्याचा व्यापारी तत्वावर वापर केला जावा असा प्रस्ताव रेल्वे विकास महामंडळानं मुंबई-ठाणे महापालिकेस दिला आहे. ठाणे महापालिकेनं रेल्वेला व्यापारी तत्वावर संकुल उभारण्यासाठी अधिकार देण्याची मागणी केली असून यामध्ये महापालिका रेल्वेला २८ कोटी रूपये देणार असून दरवर्षाला ३ कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रेल्वे स्थानकावर व्यापारी संकुल उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. तसा प्रस्ताव महापालिकेनं रेल्वे विकास महामंडळाला दिला आहे. ज्यामध्ये वाहनतळासाठी जागा, उपहारगृह अशा सुविधा दिल्या जाणार आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: